गिरिमित्र सन्मान


"पुरस्कार मिळविण्यासाठी म्हणून कोणी कार्य करीत असेल तर ते त्याचे योगदानच नाही. आपण आजपर्यंत जे काही उद्योग केले ते पुरस्कारसाठी अजिबात नाही. त्यामुळेच गिर्यारोहकांच्या केलेल्या या कौतुकाला पुरस्कार न म्हणता सन्मान म्हणावे. गिर्यारोहकांचा गिर्यारोहकांनी कृतज्ञेपोटी केलेला सन्मान" हे शब्द आहेत श्री शरद ओवळेकर यांचे. म्हणूनच गिर्यारोहकांचा केला जाणारा हा गौरव "गिरिमित्र सन्मान" म्हणून ओळखला जातो. २००५ सालापासून गिरीमित्र संमेलनातर्फे "गिरीमित्र सन्मान" नियमितपणे देण्यात येवू लागले.

महाराष्ट्राला गिर्यारोहणाची सुमारे ५५ वर्षांची प्रदीर्घ अशी झळाळती परंपरा लाभली आहे. या ५५ वर्षात महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी अनेक उत्तंग अशा भरा-या घेतल्या आहेत. सुमारे २०० हून अधिक हिमालयीन मोहिमा, तर १००० च्यावर प्रस्तरारोहण मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. पदभ्रमणाच्या उपक्रमांची तर गणतीच नाही. त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत हे अनोखे असे संस्थात्मक कार्य धडाक्यात सुरु आहे. या सर्व कार्याची नव्या पिढीस ओळख व्हावी व ज्येष्टांचा सन्मान व्हावा या उद्देशाने गिरिमित्र संमेलनाने "गिरिमित्र सन्मान" सुरु केले.

ज्येष्ठ व तज्ञ गिर्यारोहकांची एक समिती यासाठी गठीत करण्यात आली आहे. सन्मानाची व्याख्या, परिमाण याबद्दल विशेष नियमावली आखून त्यानुसार एका विशिष्ट कार्यपद्धतीत या समितीचे काम चालते. सर्व सन्मानार्थीना मानचिन्ह व मानपत्र वार्षिक संमेलनात देण्यात येते.

गिरीमित्र जीवनगौरव (१ सन्मान) संपूर्ण जीवन काळात गिर्यारोहण क्षेत्रासाठी मोलाचे योगदान.

गिरीमित्र जीवनगौरव, मरणोत्तर (१ सन्मान) संपूर्ण जीवन काळात गिर्यारोहण क्षेत्रासाठी मोलाचे योगदान.

गिरीमित्र गिर्यारोहक (३ सन्मान) गिर्यारोहण क्षेत्राची वाढ, प्रसार व प्रगतीकरिता, हातभार लावणा-या ज्येष्ठ गिर्यारोहकास.

गिरीमित्र गिर्यारोहक, मरणोत्तर (१ सन्मान) गिर्यारोहण क्षेत्राची वाढ, त्याचा प्रसार व प्रगतीकरिता, हातभार लावणा-या ज्येष्ठ गिर्यारोहकास.

गिरीमित्र गिरीभ्रमण (१ सन्मान) अनेक वर्षे संस्थात्मक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणा-या गिर्यारोहकास.

गिरीमित्र सामाजिक कार्य (१ सन्मान) गिर्यारोहणाबरोबरच सामाजिक कार्यात बहुमुल्य योगदान देणा-या संस्थेस अथवा व्यक्तीस.

उत्कृष्ठ गिर्यारोहक (१ सन्मान) गतवर्षातील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या गिर्यारोहकास.

उत्कृष्ठ प्रस्तरारोहक (१ सन्मान) गतवर्षातील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या प्रस्तरारोहाकास.

गिरीमित्र शरद ओवळेकर विशेष सन्मान (१ सन्मान) गिर्यारोहण व अनुषंगिक क्षेत्रात नवीन कार्य करणा-या संस्थेस किंवा व्यक्तीस

या सर्व सन्मानांचे वैशिष्ट्य म्हणजे या सन्मानाचा आर्थिक भर महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्थाच उचलतात. त्यामुळे गिर्यारोहकांनी गिर्यारोहकांचे कौतुक करण्याची संस्कृती आपोआप जोपासली जात आहे. सर्व सन्मानाचे मानचिन्हाचे व मानपत्राचे डिझाईन गिर्यारोहक श्री अभिजित रणदिवे यांनी केले आहे.


माजी सन्मानार्थी

सन्मानार्थी माहिती - २००९

फाईल डाउनलोड


सन्मानार्थी माहिती - २००४ ते २००८

फाईल डाउनलोड